दीपिकाने या आधी 10 जणांविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली असून ती खोटी आहे, आपल्या परिवारालाही यामध्ये तिने नाहक ओढल्याचं सांगत पीडित व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल केली.
मुंबई : रोज न्यायालयात वेगवेगळे प्रकरण समोर येतात. पण कर्नाटक उच्च न्यायालयासमोर एक हैराण करणारं सुनावणीस आलं आणि पुढे काय करावं हेच कुणाला सुचना. एका महिलेने 10 लोकांच्या सोबत लग्न केलं, त्यांच्यासोबत शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. पण आता तिने त्या दहाही पुरूषांवर बलात्काराचा आरोप ठेवला. हे प्रकरण ज्यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयात गेलं त्यावेळी न्यायाधीश चांगलेच भडकले. संबंधित महिलेची माहिती राज्यातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये द्यावी आणि या महिलेची तक्रार पुन्हा आली तर ती घेऊ नये असे निर्देश त्यांनी राज्याच्या पोलिस महानिरीक्षकांना दिले. दीपिका असं त्या महिलेचं नाव आहे.
न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील सकलेशपूरमधील कॉफी बागेचे मालक असलेले विवेक आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या विरोधात सुरू असलेला खटला रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. कोडागू जिल्ह्यातील कुशालनगरमध्ये राहणारे विवेक आणि दीपिका यांची ऑगस्ट 2022 मध्ये एका व्यावसायिक कारणाच्या निमित्ताने भेट झाली होती. त्यानंतर त्यांचा संपर्क वाढत गेला आणि त्याचे रुपांतर प्रेमात झालं.
बलात्काराचा आरोप करत तक्रार
यानंतर काहीच दिवसांमध्ये म्हणजे 8 सप्टेंबर 2022 रोजी दीपिकाने विवेकच्या विरोधात बलात्काराची तक्रार दिली. कुशलनगर पोलिसांनी हा प्रश्न आपापसात सोडवावा अशी सूचना त्यांना दिली. त्यानंतर 19 सप्टेंबर रोजी दीपिकाने दुसरी तक्रार दिली. विवेकने आपल्यासोबत लग्न केलं आणि लगेच आपल्याला सोडून दिलं अशी तक्रार तिने केली.
न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर समजलं की दीपिकाने याआधी अशा नऊ पुरूषांना फसवलं असून त्यांच्याविरोधात बलात्काराची तक्रारही दिली आहे. त्यामुळे आपल्या आणि कुटुंबीयांच्या विरोधात दाखल केलेली तक्रार तात्काळ रद्द करावी अशी मागणी विवेकने न्यायालयाकडे केली.
या आधी 10 जणांवर बलात्काराचा आरोप केला
दिपिकाने 2011 पासून बलात्कार, क्रूरता, धमकी आणि फसवणुकीचा आरोप करत एकूण 10 पुरुषांना फसवल्यासं उघड झालं आहे. त्यामधील आठ तक्रारी या बंगळुरू पोलिसांमध्ये दाखल असून एक तक्रार चिक्कबल्लापूर आणि एक मुंबई मध्ये दाखल आहे.
या दहापैकी तीन प्रकरणात आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं होतं. बाकी प्रकरणात पीडितांना बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. बराच काळ तुरुंगात राहिल्यानंतर काहींना जामीन मिळाला आहे. दीपिकाच्या विरोधात पीडितांनी ब्लॅकमेलिंक आणि फसवणुकीच्या पाच तक्रारी दाखल केल्या आहेत.
न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
दीपिका प्रकरणाने हनी ट्रॅप सारख्या प्रकरणांनाही मागे सोडल्याचं निरीक्षण कर्नाटक न्यायालयाने नोंदवलं. तक्रारकर्ती दीपिका ही सातत्याने न्यायालायासमोर खोटं बोलत आहे, कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय बलात्काराचा आरोप करत आहे असं न्यायालयाने म्हटलं. त्यामुळे यापुढे तिने कुठेही नवीन तक्रार नोंदवली तर त्याची पडताळणी केल्याशिवाय ती घेतली जाऊ नये असे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.