भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात दोन समाजात तेढ निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.
जळगाव : भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात दोन समाजात तेढ निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आज 3 ऑक्टोबर रोजी जळगाव न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे.
दोन समाजात तेढ निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध जळगाव मुख्य न्याय दंडाधिकारी कोर्टात ॲड. अजयकुमार सिसोदिया व ॲड. दीपक सोनवणे यांच्या मार्फत फिर्यादी फारूक शेख अब्दुल्ला एकता संघटन समन्वयक यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे. भारतीय नागरिक न्याय संहिता कलम 175 प्रमाणे खटला दाखल करण्यात आला आहे.
जळगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल
आमदार नितेश राणे यांनी 1 सप्टेंबर रोजी जे वक्तव्य केले होते ते मला व जळगावकरांना उद्देशून केलेले आहे. कारण 27 ऑगस्ट रोजी आमच्या तक्रारीवरून रामगिरी महाराज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला असल्याने त्यांनी आम्हा जळगावकर मुस्लीम समाजास उद्देशून बोलले. त्यामुळे फारुक शेख यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन निरीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर काही कारवाई न झाल्याने पोलीस अधीक्षक, जळगाव, पोलीस महासंचालक महाराष्ट्र विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक व जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या. मात्र त्यावर देखील काही कारवाई न झाल्याने भारतीय नागरिक न्याय संहिता कलम 175 प्रमाणे जळगाव येथील मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात हा फौजदारी खटला दाखल करण्यात आलेला आहे.
एकता संघटनेने केला खटला दाखल
जळगाव जिल्हा एकता संघटनेची स्थापना झाली असून त्यात सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व सामाजिक संघटनेतील लोकांचा समावेश असून त्यानुसार एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी ही तक्रार दाखल केली आहे. यावेळी संघटनेचे संघटक नदीम मलिक, मजहर पठाण, सलीम इनामदार, अनिस शहा , अन्वर खान, अहमद सर, इरफान अली सय्यद, युसुफ खान, फिरोज शेख व अमजद पठाण आदींची उपस्थिती होती. जळगाव न्यायालयात तक्रार दाखल केल्यावर ॲड अजयकुमार सिसोदिया, ॲड दीपक सोनवणे यांच्यासह फारुक शेख यांनी याबाबत माहिती दिली आहे.