मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीआधी गुवाहाटीचा दौरा करणार आहेत.
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. जागावाटपाची चर्चा सुरू आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार असल्याची बातमी समोर येत आहे. २०२२ साली जेव्हा शिवसेनेपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी फारकत घेतली होती. तेव्हा सूरत आणि त्यानंतर गुवाहाटीचा दौरा केला होता. सत्तांतराच्या हालचालीत गुवाहाटीचा दौरा चांगलाच गाजला. त्यातच आमदार शहाजीबापू पाटील यांच्या “काय झाडी, काय डोंगर, काय ते हॉटेल” या डायलॉगमुळे जनसामान्यांमध्येही गुवाहाटीची खमंग चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला जात आहेत.
गुवाहाटीचा दौरा केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली होती. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर गुवाहाटीमधील कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार असल्याचे कळते. प्रचाराचा नारळ कामाख्या देवीच्या मंदिरात फोडल्यानंतर ते राज्यात प्रचारचे रणशिंग फुंकणार असल्याचे सांगितले जाते.