मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांना आपल्याच गोटात घेऊन उमेदवारी देण्याची तयारी भाजपने केली आहे.
एकनाथ शिंदे, (संग्रहित छायाचित्र) लोकसत्ता टीम
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात शिंदे पिता-पुत्र आणि त्यांच्या समर्थकांचा एकहाती प्रभाव राहिला असला, तरी विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपने हा दबाव झुगारून लावल्याचे दिसून येत आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचा विरोध असतानाही कल्याण पूर्व, ठाणे, मुरबाड, ऐरोली या ठिकाणी भाजपने विद्यामान आमदारांनाच संधी दिली आहे, तर मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांना आपल्याच गोटात घेऊन उमेदवारी देण्याची तयारी भाजपने केली आहे.
२०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ठाणे जिल्ह्यात भाजपने आठ, तर तेव्हाच्या एकसंध शिवसेनेने पाच जागांवर विजय मिळवला होता. मिरा-भाईंदरच्या जागेवर भाजपच्या तत्कालीन महापौर गीता जैन या अपक्ष निवडून आल्या होत्या. त्यामुळे या संपूर्ण जिल्ह्यावर भाजपचा दबदबा अधोरेखित झाला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येताच तेव्हाचे नगरविकास आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळावर एकहाती वर्चस्व निर्माण केले. त्यामुळे राज्यातील मोठा पक्ष असूनही भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांना ठाणे जिल्ह्यात दबावाखालीच वावरावे लागत होते. त्यातच स्थानिक पातळीवरील महायुतीतील स्पर्धाही तीव्र झाली होती कल्याण नवी मुंबई, ठाणे, मुरबाड यासारख्या शहरांत भाजप आणि शिंदेसेनेतील संघर्ष टोकाला पोहचल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेच्या दबावाखाली भाजप आपले उमेदवार बदलेल, असेही चित्र तयार झाले. मात्र, भाजपने विद्यामान आमदारांवर विश्वास दाखवत शिवसेनेचा दबाव झुगारल्याचे दिसून येत आहे.
जागा वाटपानंतरही भाजप आपल्या उमेदवारांना मित्रपक्षांकडून लढवणार?
विधानसभा निवडणूक जाहीर होताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. त्यापूर्वी महायुतीमधील भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महायुतीमधील १५५ ते १६० जागा भाजप लढवणार असल्याची चर्चा आहे. शिंदे यांची शिवसेना ७५ ते ८० आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी ५० ते ५५ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु या जागा वाटपानंतर भाजप आपले काही उमेदवार मित्र पक्षांच्या चिन्हावर लढवणार असल्याची चर्चा आहे. लोकसभेत भाजपने हाच फॉर्मूला वापरला होता. आता विधानसभेतही हेच सूत्र वापरणार असल्यामुळे मित्रपक्षांनी जागा जास्त दिसणार असल्या तरी काही ठिकाणी भाजप उमेदवार लढणार आहे.
राजहंस सिंग, निलेश राणे शिंदे सेनेतर्फे लढणार
भाजपचे विधान परिषदेचे सदस्य राजहंस सिंग यांचे डिंडोशीवर लक्ष केंद्रीत केले आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे निवडणूक लढवणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सिंग हे डिंडोशी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. जिथे त्यांनी २००९ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली होती. तसेच निलेश राणे शिंदे सेनेकडून निवडणूक मैदानात उतरणार असल्याचे म्हटले जात आहे.
भाजपने नितेश राणे यांना कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. नारायण राणे खासदार आहेत. आता नारायण राणे यांचा दुसरा मुलगा निलेश राणे यांनाही तिकीट हवे आहे. परंतु ते भाजपऐवजी शिंदेसेनेकडून मैदानात उतरणार आहे. निलेश राणे 23 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि तासगाव-कवठेमहांकाळ या दोन मतदारसंघांमध्ये भाजपचे कार्यकर्ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होणार आहे. यामुळे या दोन्ही दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे.
आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती शिंदे सेनेचे उमेदवार
दरम्यान, शिंदे सेनेकडून आदित्य ठाकरे यांचे माजी निकटवर्ती राहुल कनाल यांनाही उमेदवारी दिली जाणार आहे. ते श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. त्यांचा कालिना मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय पोटणीस यांच्याशी थेट सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.