ब्रेकिंग न्यूज
रवि. डिसेंबर 22nd, 2024

स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; “ते प्रत्येक कृती विचारपूर्वक करतात,हे मान्य करायला हवं !

भाजपाच्या नेत्या तथा माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. राहुल गांधी यांचे राजकारण आता बदललं असून ते आता बोलताना किंवा एखादी कृती करताना विचारपूर्वक करतात, असे त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी चक्क राहुल गांधी यांचं कौतुक केल्याने आता राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं आहे.

स्मृती इराणी यांनी नुकताच एका पॉडकास्ट चॅनेलला मुलाखात दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना राहुल गांधी यांच्या सध्याच्या राजकारणाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या स्मृती इराणी?

“राहुल गांधी यांच्या राजकारणात आता बदल झाला आहे. ते बोलताना किंवा एखादी कृती करताना विचारपूर्वक करतात. ते संसदेत येताना पांढऱ्या रंगाची टी-शर्ट घालतात, याद्वारे तरुण पिढीला आपण काय संदेश देतो आहे, हे त्यांना माहिती आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या ते विचारपूर्वक करतात. बोलतानाही ते खूप सांभाळून बोलतात”, अशी प्रतिक्रिया स्मृती इराणी यांनी दिली.

पुढे बोलताना, “राहुल गांधी यांचे राजकारण तुम्हाला आवडत असले किंवा नसेलही किंवा तुम्हाला ते बालिशपणाचेही वाटत असेल, पण आता ते वेगळ्या प्रकारचं राजकारण करत आहेत, हे आपण मान्य करायला हवं. त्यामुळेच आता त्यांना यशही मिळू लागलं आहे”, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मिस इंडिया स्पर्धेबाबत एक विधान केलं होतं. या स्पर्धेतील विजेत्यांमध्ये दलित महिला नसल्याचे ते म्हणाले होते. या विधानाबाबत विचारलं असता, “ते अशी विधाने करून त्या घटकांच्या नजरेत सरकारची चूक लक्षात आणून देण्यासाठी अशी विधानं राहुल गांधी जाणीवपूर्वक करतात.

स्मृती इराणी यांनी २०१९ मध्ये राहुल गांधी यांचा अमेठी लोकसभा मतदार संघातून पराभव केला होता. त्यामुळे राहुल गांधी यांना वायनाडमधून निवडणूक लढवावी लागली होती. या दरम्यान स्मृती इराणी यांनी राहुल गांधी आणि गांधी कुटुंबावर जोरदार टीकाही केली होती. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने या पराभवाचा बदला घेतला. त्यांनी अमेठीतून किशोरी लाल शर्मा यांनी उमेदवारी दिली आणि शर्मा यांनी स्मृती इराणी यांचा पराभव केला होता.

By गल्लिमैदान न्युज जळगाव

आम्ही असतो दक्ष ! घेवुन वास्तवाची साक्ष ! निर्भिड, निःपक्ष, सत्य व वस्तुस्थितीवर प्रखर लिखाण , मग मैदान असो कोणतेही. गणेश पाटील संपादक

Related Post

Verified by MonsterInsights