मुंबई : मावळत्या विधानसभेतील बहुतांश म्हणजेच ९३ टक्के आमदार करोडपती असून, राज्यात सर्वांत श्रीमंत असलेले भाजपचे घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार पराग शहा यांना अजूनही भाजपाने उमेदवारी दिलेली नाही. विशेष म्हणजे मावळत्या विधानसभेतील तब्बल ६२ टक्के आमदारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल होते.
राज्यातील आमदारांचे शिक्षण, सांपत्तीक स्थिती, त्यांच्यावर दाखल गुन्हे याबाबत ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्मस’ (एडीआर) यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार राज्यात २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत २८८ मतदार संघातून तब्बल तीन हजार १३८ उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. त्यामध्ये २३७ (८ टक्के) महिला उमेदवार होते. निवडणुकीत उभे राहिलेल्यांपैकी ३० टक्के म्हणजेच ९३२ उमेदवारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. यातील २० टक्के म्हणजेच ६१८ उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. तर एक हजार १९ (३२ टक्के) उमेदवार करोडपती होते.