महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं खरं बिगूल आज वाजताना दिसत आहे. कारण भाजपकडून आज अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही जणांची तिकीट कापण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भोकरमधून खासदार अशोक चन्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याणमधून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.