ब्रेकिंग न्यूज
रवि. डिसेंबर 22nd, 2024

‘घराणेशाही नको’ म्हणणाऱ्या भाजपनेच अवलंबली घराणेशाही !

कमळ

‘घराणेशाही नको’ म्हणणाऱ्या भाजपकडून राजकीय घराण्यातील ‘या’ उमेदवारांना तिकीट

 

देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images    दीपाली जगताप  बीबीसी मराठी

“1 लाख कुटुंबातील तरुणांना आम्ही पुढे आणू इच्छितो ज्यांचा राजकीय घराण्यांशी कोणताही संबंध नाही. ज्यांचे आई, वडील, भाऊ, बहीण, काका, मामा असे कोणीही राजकारणात नाही. मग ते पंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा विविध माध्यमातून राजकारणात येऊ इच्छितात. जेणेकरून राजकीय घराणेशाहीपासून, जातीयवादापासून मुक्ती मिळू शकेल. यामुळे लोकशाही बळकट होऊ शकेल.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजेच स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात हे वक्तव्य केलं होतं.

राजकारणातील घराणेशाहीला विरोध करणारं हे त्यांचं पहिलंच विधान नाही. आतापर्यंत नरेंद्र मोदी, अमित शहा, अशा भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी वारंवार राजकारणातील घराणेशाहीला भाजप प्रोत्साहन देत नसल्याबाबत भूमिका मांडली आहे. परंतु महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत अशा अनेकांना पक्षाने संधी दिली आहे.

रविवारी (20 ऑक्टोबर) भाजपने आपली विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर केली. यात 99 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु कायम घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपने आपल्या पहिल्याच यादीत राजकीय घराण्यातील अनेकांना स्थान दिलं आहे.

काँग्रेसनेही यावर टीका केली असून, “भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत,” असं प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलंय.

तर भाजपने राजकीय घराण्यामुळे उमेदवारी दिली हा आधार खोडून काढला आहे. “भाजप कायम सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देत असून उमेदवारी दिलेल्यांनी पक्षासाठी वर्षानुवर्षे काम केलं आहे,” असं प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं.

राजकीय घराण्यातील ‘या’ उमेदवारांना तिकीट

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात उमेदवार यादी जाहीर करण्यात भाजपने आघाडी घेत 99 जणांची नावं जाहीर केली.

यात अनेक बहुतांशी विद्यमान आमदारांना कायम ठेवत 13 महिला उमेदवारांनाही संधी दिली आहे. तर महायुतीत सर्वाधिक जागा लढवत आणखी सुमारे 40-50 जागांवर भाजप आपले उमेदवार जाहीर करेल अशी माहिती आहे.

भाजपच्या या उमेदवारी यादीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक नवीन चेहरे असले तरी यात राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. हे उमेदवार कोणते? पाहू.

भाजप नेते आशिष शेलार

1) विनोद शेलार – भाजपचे मुंबई शहराचे अध्यक्ष, माजी मंत्री आणि आमदार आशिष शेलार यांना तिसऱ्यांदा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देत सोबतच त्यांचे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिम येथून उमेदवारी दिली आहे.

विनोद शेलार हे भाजपचे माजी नगरसेवक असून मुंबई भाजपचे सचिव आहेत. ते यापूर्वी मुंबई महानगरपालिकेतही विविध पदांवरती कार्यरत होते.

2) श्रीजया चव्हाण – लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे.

अशोक चव्हाण आणि श्रीजया चव्हाण

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांना पक्षाने राज्यसभेवर संधी दिली. यामुळे आता त्यांचा नांदेड जिल्ह्यातील परंपरागत मतदारसंघ भोकर विधानसभा मतदारसंघातून कन्या श्रीजया यांना उमेदवारी देण्यासाठी ते आग्रही होते.

एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलेल्या श्रीजया यांनी यापूर्वी भाजप विधानसभा प्रमुख म्हणून काम पाहिलेलं आहे.

3) सुलभा गायकवाड – भाजपने कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुलभा गायकवाड या भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी आहेत.

भाजपचे आमदार गणपत गायकवाड कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबाराच्या प्रकरणात तुरुंगात असून त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपने संधी दिली आहे. गणपत गायकवाड हे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्याच्या प्रकरणात आरोपी आहेत.

सुलभा गायकवाड या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती.

रावसाहेब दानवे

फोटो स्रोत, Getty Images

4) संतोष दानवे – भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि मराठवाड्यात पक्षाचा चेहरा असलेल्या रावसाहेब दानवे यांच्या चिरंजीवांना भाजपने विधानसभेसाठी संधी दिली आहे. दानवे यांचे पुत्र आणि भाजपचे विद्यमान आमदार संतोष दानवे यांना भोकरदन मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

5) अमोल जावळे – भाजपने माजी खासदार हरीभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांनाही विधानसभेसाठी संधी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा संधी दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती.

6) शंकर जगताप – भाजपने पिंपरी-चिंचवड मतदारसंघातून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी दिली आहे.

यापूर्वी लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या निवडून आल्या होत्या. परंतु त्यांचं तिकीट कापत शंकर जगताप यांना संधी देण्यात आली आहे.

शंकर जगताप हे पिंपरी चिंचवडचे भाजपचे शहराध्यक्ष आहेत. ते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी अश्विनी जगताप यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, “प्रत्येकालाच आपली इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. आणि मी सुद्धा इच्छुक आहे.”

दरम्यान, या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही दावा केल्याची माहिती आहे.

लक्ष्मण जगताप आणि शंकर जगताप

फोटो स्रोत, Facebook/iShankarJagtap

फोटो कॅप्शन, लक्ष्मण जगताप व शंकर जगताप

7) राहुल आवाडे – भाजपने इचलकरंजी मतदारसंघातून आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख प्रकाश आवाडे यांची ओळख होती. मात्र पाच वर्षांपूर्वी ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि 2019 ची निवडणूक अपक्ष लढवली होती.

प्रकाश आवाडे यांनी आपले पुत्र राहुल आवाडे यांच्यासह गेल्याच महिन्यात (सप्टेंबर 2024) केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

राहुल आवाडे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत.

8) प्रतिभा पाचपुते – भाजपने श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते, विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना संधी दिली आहे.

प्रतिभा पाचपुते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

याशिवाय, नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे, धनंजय महाडिक यांचे चुलत बंघू अमल महाडिक, अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांनाही भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली आहे.

प्रत्येक जागा जिंकण्यासाठीचा संघर्ष

भाजपने यापूर्वी विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही राजकीय वारसा असलेल्या अनेकांना संधी दिलेली आहे. परंतु राजकीय घराणेशाहीला पक्ष प्राधान्य देणार नाही अशी भूमिका सातत्याने भाजपच्या नेत्यांनी मांडली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. तसंच गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणंही पूर्ण बदललेली आहेत. तसंच विविध समाजांच्या आरक्षणाचा मुद्दा हा या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे.

तसंच 2019 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निकालात सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला आपला मुख्यमंत्री करता आलेला नाही. यामुळे या विधानसभा निवडणुकीत महायुतीत सर्वाधिक जागांवर उमेदवार देत भाजपने विजयाचं लक्ष्य ठेवलं आहे. यामुळे प्रत्येक जागा पक्षासाठी महत्त्वाची असून ती जिंकण्यासाठी भाजपची रणनिती आहे.

याचं विश्लेषण करताना ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी सांगतात, “महाराष्ट्रात यावेळेस अत्यंत अटीतटीची लढत होणार आहे. भाजपची यादी पाहिल्यास पक्षाने सुरक्षित उमेदवार दिले आहे. पक्षाला ज्यावेळी अत्यंत आत्मविश्वास असतो त्यावेळी भाजपतर्फे काही प्रयोग केला जातो, धक्कातंत्र वापरले जाते. परंतु यावेळेस असं काही न करता पक्षाने सुरक्षित नावं आतापर्यंत जाहीर केली आहेत. भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही असं यातून दिसतं.

“राजकीय घराणेशाहीतील उमेदवारांकडे रिसोर्सेस, निवडून येण्याची क्षमता या गोष्टी पाहिल्या जातात. त्याठिकाणी नवीन उमेदवार दिला असता तर या परिस्थितीत ते परवडणारं नव्हतं. कारण मग तिथे बंडखोरी होऊ शकते, दुसऱ्या उमेदवाराला स्थानिक पातळीवर मदत केली जात नाही. हा धोका पत्करायचा नव्हता. म्हणून अनेक ठिकाणी ही उमेदवारी दिलेली आहे. इतकंच काय तर अँटी इनकंबसी असूनही आणि काही जणांनी इच्छा नसल्याचं सांगूनही जागा निवडून येईल या आधारावर संधी दिल्याचं दिसतं.”

तर कोणताही राजकीय पक्ष याला अपवाद नाही असं ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मृणालिनी नानीवडेकर सांगतात. त्या म्हणाल्या, “कोणत्याही राजकीय पक्षात जिंकण्यासाठीच उमेदवारी दिली जाते. विशेषतः जेव्हा अटीतटीचा सामना असतो. सर्वच पक्षांसाठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. सर्वच पक्ष जिंकण्यासाठीचं गणित पाहून संधी देत असतात. याला कोणताही पक्ष अपवाद नाही. भूमिकांबाबत बोलायचं झालं तर काँग्रेसही म्हणतं की भ्रष्टाचाराला विरोध आहे परंतु भ्रष्टाचार झालाच.”

केशव उपाध्ये

फोटो स्रोत, Facebook/keshavupadhye

फोटो कॅप्शन, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये

यासंदर्भात आम्ही भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याशी बोललो, “भाजपकडून नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळत आली आहे. राजीव गांधींचा मुलगा आहे म्हणून राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना संधी द्यायची अशी भाजपची पद्धत नाही. ज्यांना उमेदवारी दिली गेली आहे ते पक्षासाठी वर्षांनुवर्षं काम करीत आहेत. त्यांच्या कामामुळे उमेदवारी दिली गेलीय. युवा मोर्चाच्या सामान्य कार्यकर्त्यापासून सर्वसामान्यांना संधी दिली आहे.”

ते पुढे सांगतात, “उमेदवार निश्चित करत असताना भाजप सर्व गोष्टींचा विचार करतं. संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांसोबत समाजातलं समीकरणं, याचा शास्त्रीय पद्धतीने सर्व्हे केला जातो. यानंतर निर्णय घेतला जातो. उगीचच तिकीट दिलं असं होत नाही.”

दरम्यान, ही भाजपची पहिलीच यादी असून पुढच्या दोन दिवसांत भाजप उर्वरित सुमारे 40-50 जागांची यादीही जाहीर करण्याची शक्यता आहे.

By गल्लिमैदान न्युज जळगाव

आम्ही असतो दक्ष ! घेवुन वास्तवाची साक्ष ! निर्भिड, निःपक्ष, सत्य व वस्तुस्थितीवर प्रखर लिखाण , मग मैदान असो कोणतेही. गणेश पाटील संपादक

Related Post

Verified by MonsterInsights