पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे जलपूजन केले होते. परंतु अजूनही त्या स्मारकाचे काम सुरु झाले नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वशंज आणि स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे संतप्त झाले आहे. त्यांनी रविवारी अरबी समुद्रात जाऊन स्मारकाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार मग स्मारक का होत नाही? सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून का उभा राहिला नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहे.
काय म्हणाले संभाजीराजे
कोणत्याही प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन होते तेव्हा सर्व परवानग्या असणे गरजेचे होते. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी करोडो रूपये खर्च केले गेले. मग कुठे आहे हे स्मारक? त्यामुळे आम्ही स्मारकाच्या शोधसाठी मोहीम आम्ही काढली आहे. राज्यातील १३ कोटी जनतेला सरकारने उत्तर द्यावे. आम्ही कायदा हातात घेणार नाही, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले.
स्मारकाच्या ठिकाणी असलेले आमचे बोर्ड काढून टाकले आहेत. परंतु महायुतीचे बोर्ड तसेच आहेत. आम्ही समुद्रात स्मारकाच्या पाहणीसाठी जाणार आहोत. परंतु ज्या बोटने जाणार आहोत, त्या बोटवाल्यांना भाजपकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्यांना परवाना रद्द करण्याची धमकी दिली गेली आहे.
मोदींना महाराष्ट्र सरकारला विचारले पाहिजे…
आम्ही धमक्यांना घाबरणार नाही. जिथेपर्यंत आम्हाला परवानगीह आहे तिथे पर्यंतच जाणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चूक होत आहे. त्या ठिकाणी परवानग्या नव्हत्या तर मग ते आले का? ८ वर्षांपासून काहीच काम झाले नाही. मोदींनी महाराष्ट्र सरकारला विचारले पाहिजे. माझ्या हस्ते जलपुजन करूनही काहीच काम का केले नाही. राज्यातील जनतेची ही फसवणूक केली आहे. आज आम्ही शिवरायाचा स्मारकाचा मुद्दा घेतला आहे. पण इंदू मिलमधल्या बाबासाहेबांच्या स्मारकाबद्दल पण हीच भूमिका आहे.
उदयनराजे आणि मी आम्ही दोन्ही वेगळे घटक आहोत. आमचा पक्ष वेगळा आहे. ते त्यांची बाजू मांडतात मी माझी बाजू मांडत आहे. मी वेळो वेळी स्मारकाबाबत भुमिका मांडली आहे. मुंबई मनपाची निवडणूक असताना भाजपाने जलपुजन करून तेव्हा राजकारण केले होते, असा आरोप संभाजीराजे यांनी केला.
“आम्ही त्यांच्या पाठीशी”- संजय राऊत
संभाजीराजेंना आमचा विरोध नाही, पण खरंतर त्यांच्यासोबत उदयनराजे भोसलेंनीही जायला हवं. जे कोणी छत्रपती शिवरायांचे वंशज या राज्यात आणि राज्याबाहेर आहेत, त्या सर्वांनी यावं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असेही संजय राऊतांनी सांगितले.
मुंबईत पोहोचताच जोरदार भाषण
दरम्यान छत्रपती संभाजीराजे हे पुण्याहून मुंबईत अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत लाखो शिवप्रेमी आणि शिवभक्तही पाहायला मिळत आहेत. यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी मुंबईत पोहोचताच जोरदार भाषण केले. यावेळी त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आले.